Saturday 20 April 2024

चर्मण्वती/चंबळ नदीचा वास्तविक अर्थ


चर्मण्वती किंवा चंबळ नदीचं नाव गाईच्या चामड्यावरून, गोमांसावरून पडलं आहे काय???

९ वर्षांपूर्वी जेव्हा पाखण्ड खण्डिणी नावाने ब्लॉग सुरू केला, तेव्हाच खरं तर यावर लिखाण करून झालेलं आहे पण पुन्हा पुन्हा हिंदुधर्म, संस्कृती आणि परंपरा यावर आक्षेप घेणाऱ्यांची वावटळ उठते आणि म्हणून ती शांत करण्यासाठी पुन्हा पुन्हा आह्मांस लेखणी हातात घ्यावी लागते....

कुणीतरी लिहिलंय म्हणे की चर्मण्वती किंवा चंबळ नदीचे नाव हे राजा रंतिदेवाच्या यज्ञांमध्ये रोजच्या २००० गाईंच्या आणि २००० अन्य पशुंच्या रोज केल्या जाणाऱ्या हत्येवरून आणि त्याचं मांस किंवा चामडं धुतल्या जाणाऱ्या पाण्यावरून निर्माण झालेल्या नदीरुपाने पडलंय म्हणे!

याचं सप्रमाण खंडन👇👇👇

मूळात व्याकरणानुसार “चर्मण्वती' हे पद 'चर्मन् + वत् + ई असे बनतं.

मराठीत आपण चर्म शब्द चामडं या अर्थाने घेतो हे बरोबर आहे पण संस्कृत शब्दांचे धात्वर्थानुसार एकापेक्षा अनेकार्थ होतात व प्रकरणानुसार ते घ्यावे लागतात यावर मागे अनेकवेळा लिहून झालंय, जुने लेख शोधावेत, त्यामुळे एकच अर्थ घेतल्याने अनर्थ ओढवतो कसा ते पाहुयांत. वस्तुतः आपल्या पूर्वजांना याची जाणीव होती म्हणून त्यांनी फार आधीच या भ्रमाचं निरसन करून ठेवलंय. उणादि कोश या व्याकरणकोशामध्ये चर्म शब्दाचा वास्तविक अर्थ आहे- 

चरति गच्छन्ति येन तत्‌ चर्मः।
( उणादि कोष ८।११५)

ज्याने पुढे जातो, कीर्तींस प्राप्त होतो असं ते चर्म ! इथे चर्म शब्दाचा चामड्याशी किंवा गायीच्या मांसाशी किंवा चामड्याशी किंवा त्याला धुतल्या जाणाऱ्या पाण्याशी काहीही संबंध नाही बरंका !

या विकृत आरोपाचं मूळ कुठंय???

हिंदुद्वेष्ट्या मार्क्सवादी विचारवंत राहुल सांस्कृत्यायनांचे 'व्होल्गा ते गंगा' हे विकृत पुस्तक

ज्या महाभारतातल्या राजा रंतिदेवाच्या संदर्भाने ही गोष्ट सांगितली जाते, तो रंतिदेव नावाचा राजा म्हणे यज्ञामध्ये रोज २००० गायी व २००० अन्य पशु रोज ब्राह्मणांसाठी कापून त्यांचं मांस त्यांना खायला देत असे म्हणे व ते मांस किंवा त्यावरचं चामडं धुताना जे पाण्याचे पाट वाहिले, ती म्हणे चर्मण्वती नदी !

कदाचित राहुलजी व त्यांचे मानसपुत्र आक्षेपक हा प्रसंग रोज पहायला गेले असावेत किंवा समय यंत्र म्हणजे टाईम मशीन असावं त्यांच्याकडे !

दुर्दैवाने हाच आरोप आहे तसा मूळ महाभारताच्या एखाद्या श्लोकाचाही कुठलाही संदर्भ न देता The History and Culture of Indian People खंड द्वितीय पृष्ठांक ५७९वर केला गेला आहे. कुठलाही संदर्भ न देता!

मला एक सांगा रोज २००० म्हटलं तर त्याच्यासाठी पाणी किती लागेल बरं इतकं मांस रोज खाल्ल्यानंतर ते ब्राह्मण लोक किंवा कोणताही माणुस जिवंत राहु शकेल का? कुणी कितीही अट्टल मांसाहारी असला तरी त्याने रोज गोमांस हजारो किलोने खाऊन दाखवावं बघु. राहुलजींसारख्या आक्षेपकांनी रोज किलोभर तरी खावं.

बरं मूळात हा भारतदेश, इथलं वातावरणही पाश्चात्य राष्ट्रांसारखं मांसाहार पचवायसाठी अनुकूल नाही. तिथंही ते कितपत पचत असेल ते मांसाहार करणारेच जाणोत. यात कुठेही मांसाहाऱ्यांची निंदा किंवा तुच्छता अभिप्रेत नाही.

बरं दिवसाला २००० म्हणजे वर्षभरात गोवंश अख्खा आणि पशुवंश पूर्ण नष्ट होऊन जाईल म्हणजे व्यावहारिक दृष्टीने विचार केला तरी हे विधान अत्यंत बालिशपणाचं आणि अत्युक्तीचं वाटतं.

पण 'व्होल्गा ते गंगा' हा ग्रंथ लिहिणाऱ्या मार्क्सवादी विचारवंत राहुल सांस्कृत्यायनजींना याचा थोडाही विवेक सुचला नाही, त्यांनी लिहिलं की ह्मणें

राजा रंतिदेवाकडून अशा दररोजच्या २००० गाईंच्या आणि अन्य २००० पशुंच्या मांसांने किंवा चामड्याने धुतल्या जाणाऱ्या पाण्याने ही चर्मण्वती नावाची नदी तयार झाली म्हणे व तिने रंतिदेवाला कीर्ति प्राप्त झाली म्हणे...

वास्तविक पाहता महाभारतामध्ये रंतिदेवाला कीर्ती म्हणजे नावलौकिक कोणत्या कारणामुळे प्राप्त झाला हे स्पष्ट सांगताना म्हटलेलं आहे की त्याने अनेक ऋषीमुनींना आणि ब्राह्मणांना कंदमुळे, फळे, अन्न, गायी, बैल वगैरे यांचे दान केलं म्हणून तो कीर्तीस प्राप्त झाला, यात कुठेही मांस दिल्यामुळे किंवा गोमांस दिल्यामुळे तो कीर्तींस पावला असे पुसटसंही म्हटलेलं नाही...

तो श्लोक असा आहे

रन्तिदेवेन लोकेष्टा सिद्धिः प्राप्ता महात्मना।
फलपत्रैरथो मूलैर्मुनीनर्चितवांश्च सः।

महाभारत शांतिपर्व अध्याय २९२

इथे रंतिदेवांस प्राप्त झालेली कीर्ती ही त्याने ऋषिमुनींना दिलेल्या कंदमुळे, फलादिंनी झालीय असे स्पष्ट लिहिलंय, इथे कुठेही मांसाचा पुसटसाही उल्लेख नाही. गोमांस तर नाहीच नाही...

तरीदेखील महाभारताच्या श्लोकातल्या काही शब्दांचा सोयीस्कर अर्थ काढून राहुल सांस्कृत्यायन या मार्क्सवादी लेखकाने ही चूक केली व त्यांच्या हिंदुद्वेष्ट्या, वेदद्वेष्ट्या मानसपुत्रांनी म्हणजे सर्व डाव्यांनी, पू-रोगाम्यांनी, समाजवाद्यांनी, सगळ्यांनीच त्यांचीच री ओढत गरळ ओकली व ओकताहेत...गेली अडीचशे वर्षे!

आता महाभारतामध्ये रंतिदेवाचं मूळ चरित्र काय आहे ते पाहुयांत...

अनुशासन पर्व ११५ अध्याय गीताप्रेसच्या प्रतीनुसार श्लोक संख्या ६३ पासून ते ६७ पर्यंत अनेक राजांची नावे घेतली गेलेली आहेत, ज्यांनी कधीही आयुष्यात मांस खाल्लं नाही, त्यामध्ये राजा रंतिदेवाचं सुद्धा नाव आहे, भांडारकर आणि चित्र शाळेच्या प्रतींमध्ये हाच प्रसंग थोड्या वेगळ्या श्लोक संख्या आणि अध्यायाच्या प्रमाणे आहे पण रंतिदेव शुद्ध शाकाहारी होता हेच सांगितलं आहे.

जर राजा रंतिदेव आपल्या रोजच्या यज्ञामध्ये हजारो गाईंची हत्या करून ब्राह्मणांना खायला गोमांस देत असेल तर यज्ञाचा प्रसाद म्हणून थोडं तरी त्याने स्वतः ग्रहण करायला हवं होतं की? काय अडचण होती? पण वर म्हटल्याप्रमाणे त्याचा उल्लेख कधीही मांस न खाल्लेल्या राजांमध्ये आहे, का बरं???

बरं याच महाभारतामध्ये शांतिपर्वामध्ये राजधर्म प्रकरणांमध्ये अध्याय २९ मध्ये महाभारत युद्ध संपल्यावर कुलक्षय झाल्याच्या शोकाने ग्रसित असलेल्या युधिष्ठिराला उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने ज्या प्राचीन राजांची कथा व नावे सांगितली आहेत की ज्यांना आपल्या कर्तुत्वाने अनेक शुभकर्मांनी कीर्ती प्राप्त झाली, नावलौकिक प्राप्त झाला, त्यामध्ये राजा रंतिदेवाचा उल्लेख आहे आणि ही कीर्ती त्यांना अनेक प्रकारचे दान केल्याने प्राप्त झाली असे म्हटले आहे, कुठेही गोमांस किंवा अन्य पशुंचे मांस ब्राह्मणांना किंवा ऋषिमुनींना किंवा याचकांना खायला घातलं म्हणून कीर्ति प्राप्त झाली असं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं नाही.

आलम्भन, आलभ्यन्त आदि शब्दाचा अर्थ स्पर्श करून सोडून देणे आहे, हत्या किंवा हिंसा करणे नव्हे बरंका...

वैदिक यज्ञामध्ये हिंदु लोक पूर्वी अनेक प्रकारच्या पशूंना किंवा गाईंना मारून त्यांचं मांस खायचे असा घाणेरडा आरोप करणारे लोक वेदमंत्रांमध्ये किंवा अन्य संस्कृत साहित्यामध्ये येणाऱ्या पशुयज्ञाच्या संबंधाने आलम्भन या शब्दावरून लगेचंच त्या निर्दोष पशुची हत्या असा विकृत अर्थ काढतात, दुर्दैवाने अनेक सनातनीही तसाच अर्थ काढतात, खरंतर दोषी हे लोक आहेत, कुणाला राग आला, लोभ आला, मी कुणाचा मान राखत नाही....

पण आमच्या पूर्वमामांसाकारांनी स्पष्टपणे आलम्भन शब्दाच्या दृष्टीने विवेचन करून ठेवले आहे

मीमांसा दर्शन २।३।१७ येथील सुबोधिनी टीकेमध्ये

आलम्भः स्पर्शो भवति।

स्पर्श हेच आलंभन आहे असे म्हटलं आहे, म्हणजेच पशुची कोणतीही हिंसा इथे अभिप्रेत नाही. याच पूर्वमीमांसेमध्ये

अपि वा दानमात्रं स्याद्भक्षशब्दानभिसम्बन्धात्।
पूर्वमीमांसा - १०।७।१५

येथे 'भक्ष्य' शब्दावरून खाणे न करता केवळ दान सांगितलं आहे म्हणजेच वैदिक पशुला सोडून देणे...

शांतिब्रह्म संत श्रीएकनाथांनी सुद्धा नाथ भागवतामध्ये आलंभन शब्दाने यज्ञीय पशुला स्पर्श करून सोडून देणे इतकाच अर्थ सांगितला आहे, त्याला मारणे असं नव्हे.

वास्तविक पाहता ९ वर्षांपूर्वीच यावर सविस्तर लिहिलेलं आहे, आमचा ब्लॉग पहावा!

आता सांस्कृत्यायनजींचं संस्कृतचं घोर अज्ञान पहा

द्रोणपर्वाच्या अध्याय ६७ च्या 'यस्य द्विशतसाहस्रा आसन् ।' या श्लोकाचा अनुवाद त्यांनी करताना असे लिहिलंय की राजा रंतिदेवाच्या पाकगृहामध्ये २००० बल्लव म्हणजे स्वयंपाकी लोक गोमांस तयार करायचे.

द्विशतसाहस्राचा अनुवाद २लाख करायचा सोडून २००० केला आहे, ही ह्यांची विद्वत्ता ! संस्कृतचं थोडंफार ज्ञान असलेल्या कुठल्याही शेंबड्या मुलालाही द्विशतसाहस्राचा अर्थ २लाख सोडून २००० करावासा वाटेल का हो? पण या मार्क्सवाद्यांनी वाट्टेल ते लिहायचं, त्यांच्या मानसपुत्रांनी तेच रेटायचं व आह्मींही तेच वाचायचं???

बरं या राहुल सांस्कृत्यायन यांची आणखी विकृती पहा

यांनी महाभारतातल्या अनेक श्लोकांमध्ये मासं असा शब्द गाळून मांसं असा सोयीस्कर श्लोक आपल्या पुस्तकात लिहिलाय व वाट्टेल ते अर्थ काढलेत. आता याला मार्क्सवाद नाहीतर काय म्हणायचं??? मास(महिना) नि मांस दोन्ही शब्द वेगळे आहेत हे सांगायची आवश्यकता आहे???

क्षणभर मांस शब्द योग्य आहे असेही समजुयात....

९ वर्षांपूर्वीच लिहिलंय की शतपथ ब्राह्मण या यजुर्वेदाच्या व्याख्यानरुपी ग्रंथामध्ये

'एतदु ह वै परमान्नाद्यं यन्मांस। (११।७।१।३)

इथे मांसाचा अर्थ परमान्न म्हणजेच अमरकोशानुसार 'परमान्नं तु पायसम् (२।७।२४)' म्हणजे मांस शब्दाचा अर्थ पायस घ्यावा असाच आदेश आहे. आता पायस म्हणजे दुध आणि तांदळाची गोड खीर ! कारण यज्ञाची दीक्षा घेतलेल्याला मैथुन करण्याचा किंवा मांस खाण्याचा अधिकारच नाही, अशी स्पष्ट वेदांची आज्ञा आहे. त्यामुळे पशुचं मांस हा अर्थ कुठेच सिद्ध होत नाही. त्यामुळे वैदिक यज्ञामध्ये हिंदू लोक वेगवेगळ्या प्रकारचे मांस खायचे किंवा त्यांना तशी वेदांची आज्ञा आहे हा आरोप इथेच पूर्णतः निराधार सिद्ध होतो...

पण तरीही आज रोज रोज हेच खोटं रेटलं जातं की हिंदु लोक वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञामध्ये गोमांस मारून खायचे. किती दिवस ही विकृती सहन करायची???

गेली अडीचशे वर्षे हेच सुरु आहे...

बर या सगळ्या मागे या लोकांचा मूळ हेतु काय आहे???

तर हिंदू संस्कृती कशी तुच्छ होती, वाईट होती, असं सिद्ध करण्याचा अट्टाहास !

इतकंच नव्हे तर मुस्लिमांकडून किंवा ख्रिश्चनांकडून जी गोहत्या हत्या केली जाते व आपला गोवंश संपवण्याचा अट्टाहास सुरू आहे, त्याचं समर्थन करण्यासाठी आमच्या हिंदू धर्मशास्त्रांमध्येच कसं गोमांस खायला सांगितलं आहे असं बळंच रेटण्याचा प्रयत्न करणे हे डावं षडयंत्र आहे...

मी मागे लिहिलेलं आहे की एकीकडे हे लोक भारत देश हा बळीराजाचा देश आहे म्हणजेच शेतकऱ्यांचा देश आहे, इथली कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे म्हणून बेंबीच्या देठापासून बोंबलतात आणि दुसरीकडे हेच लोक गोमांस खाण्याचं समर्थन करतात

किती हलकटपणा आहे पहा !

वेळीच सावध व्हा!

विनाकारण बुद्धिभेद करून मूळ विषयापासून लक्ष भरकटविणे हे डाव्यांचे जुने धंदे आहेत!

वैधानिक सूचना - मांसाहार कुठे वाईट आहे, हिंदूंनी मांस खाल्लं तर बिघडतं कुठे अशा प्रकारचा हास्यास्पद युक्तिवाद करणाऱ्या स्वयंघोषित बुद्धिवादी नवहिंदुत्ववाद्यांनी म्हणजे उजव्या समाजवाद्यांनी मला अक्कल शिकवायला इथे येऊ नये, वाईट शब्दांमध्ये पुन्हा एकदा अपमान केला जाईल हे आधीच सांगतो...

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#राजारंतिदेव_चर्मण्वती_नदी_चंबळ_नदी_महाभारत_गोमांसाहार_वैदिकयज्ञसंस्था


Wednesday 17 April 2024

त्यागेनैके अमृतत्वमानुषुः।


१८० लक्ष वर्षांपूर्वीचं रामायण आजही का प्रमाण वाटतं? (याची कालगणना मागे दिलीय, आह्मीं शास्त्र प्रमाण मानणारे आहोत) ज्याला आपण प्रत्यक्ष कधी पाहिलं सुद्धा नाही, ना तो आपल्या नात्यातला ना गोत्यातला ना आपला तसा काही रक्ताने पूर्वज असा, अशी व्यक्ती आपल्याला का आदर्श वाटावी? दोन शब्दांत दोन संस्कृती असा लेख लिहिणारे अनेक असतीलही, कुणाविषयी अनादर नाही, पण विश्वदिग्विजयी श्रीमत् स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृती ज्या त्याग आणि सेवा या दोन आदर्शांवर आधारलेली आहे, किंबहुना या दोन आदर्शांशिवाय भारतीय संस्कृतीचं अस्तित्वही आपण कल्पू शकत नाही, त्यातला त्याग हा जो काही आदर्श आहे तो ज्या या पुराणपुरुषाच्या, इतिहास पुरुषाच्या चरित्रामध्ये सातत्याने दृग्गोच्चर होतो, त्या अमृतत्वाची प्राप्ती केलेल्या लोकोत्तर आणि महनीय व्यक्तिमत्त्वाचं चिंतन आम्हास का करावसं वाटतं???

काही क्षणांमध्ये ज्याचा राज्याभिषेक होणार आहे असा एक युवक ती राज्याभिषेकाची आज्ञा ऐकनाताही शांत, निश्चल नि निर्विकार होताच, पण ज्याला पुढील काही क्षणभरात सांगितले जाते की तुला आता १४ वर्षांचा वनवास स्वीकारावा लागेल आणि हे ऐकल्यावरही तो कुठल्याही प्रकारची उद्विग्नता, आक्रोश, हास्य, द्वेष, दुःख, असूया, वेदना, पीडा, विलाप न दर्शविता अत्यंत शांतपणे तशा प्रकारची आज्ञा देणाऱ्या आपल्या त्या मातेचे कोड कौतुक तर करतो आणि जणू काही तिने आपल्यावर उपकार केले आहेत, अशा प्रकारची भाषा करतो.

सकाळी साधा वेळेवर चहा किंवा उपाहार नाही मिळाला तर आमची दिवसभर चीडचीड होते, आम्हाला त्रास होतो, संताप होतो, दिवसाची सुरुवात कोणाचे तोंड पाहून झाली अशी भावना आमच्या अंतकरणात येते; अशावेळी हा ऐन सदतिसाव्यांत पोहोचलेला युवक (आषोडशात् सप्ततिवर्षपर्यम्तं यौवनम् - कामसूत्र) की माझ्यावर आता खऱ्या अर्थाने उपकार झालेले आहेत आणि मला मिळालेली वनवासाची आज्ञा ही माझ्या दृष्टीने अत्यंत वरदानच ठरणार आहे.

आश्चर्य म्हणजे ज्याच्यामुळे ही आज्ञा त्याला मिळाली, तो त्याचा जन्मदाता पितासुद्धा त्याला तु मला कारावासात का डांबत नाहीस अशी स्पष्टपणे आज्ञा देत असूनही हा माणूस चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची रेषही न ढळता की आपल्या जन्मदात्या पित्यालाच निजकर्तव्याचा बोध देत शांत करतो आणि रघुकुलाची 'प्राण जाई मगर बचन न जाई' या वचनाची स्मृती जागृत करतो.

सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्या चित्ताची समतोलता कुठेही न ढळु देणारा हा पुरुषोत्तम केवळ भारतीयंच नव्हे तर अखिल मानवज्ञातीचा जीवनादर्श का आहे??? 

आहुतस्याभिषेकाय विसृष्टस्य वनाय च। न मया लक्षितस्तस्य स्वल्पोप्याकारविभ्रमः।

महानाटक 

राज्याभिषेकाला बोलाविते समयी आणि वनवासाची आज्ञा दिल्यानंतर वनवासाला जाते वेळी ज्याच्या चेहऱ्यावरची एक रेषही हलली नाही, म्हणजेच चेहऱ्यावरचे भाव दोन्ही अवस्थांमध्ये समान होते, याचा अर्थ तो भावनाशून्य होता किंवा निर्लज्ज होता किंवा संवेदनाशून्य होता असा नसून त्याच्या अलौकिक स्थितप्रज्ञतेचा नि पुरुषश्रेष्ठत्वाचा तो मूर्तिमंत साक्षात्कार होता.

तो ईश्वरी अवतार आहे किंवा नाही हा भाग स्वतंत्र आहे, तो प्रत्येकाच्या स्वतंत्र चिंतनाचा, अनुभवाचा, श्रद्धेचा सद्गुरु प्राप्त कृपाशिर्वादाचा विषय आहे, ज्याचं त्याने ठरवावं, पण आमचा इतिहासपुरुष म्हणून आह्मीं जेंव्हा रामादिवत् वर्तितव्यं म्हणतो, तेंव्हा त्याचा आधार काय???

तर कैवल्योपनिषदांत म्हटल्याप्रमाणे त्यागानेच प्राप्त होणारं हे अमरत्व, कैवल्यत्व!

हे प्रजेने किंवा संततीने किंवा धनप्राप्तीने होत नाही तर केवळ त्यागानेच होते.

त्याच्या अखंड नामस्मरणाने प्राप्त होणारी बुद्धीची स्थिरता हा प्रत्येकाच्या अनुभूतीचा विषय आहे, संतसम्राट कैवल्य चक्रवर्ती श्रीज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे सुरवंटामध्ये रूपांतर होणे असा काहीसा जो दृष्टांत आहे, हा जो काही विषय आहे प्रत्येकाच्या श्रद्धेचा असल्याने त्यावर इथे विस्तार करणे नको, कारण हे असे विषय बोलूच नयेत....

पण तरीही उपास्य देवतेची भक्ती म्हणजेच त्याचे गुण आपल्या अंगी धारण करणं हीच तर भक्तीची व्याख्या आहे असे म्हटल्यांस वावगं ठरणार नाही...

भगवान श्रीरामरायाच्या जन्मोत्सवानिमित्त त्याच्या चरणी ही वाग्पुष्पांजली !


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

PakhandKhandinee.blogspot.com


#श्रीरामनवमी_श्रीरामजयंती_वनवास_भारतीय_संस्कृती_त्याग_विवेकानंद

 

Monday 8 April 2024

मृत्युंजय...

 



मृत्यू न ह्मणें हा भूपती। मृत्यू न ह्मणें हा चक्रवर्ती।

दासबोध ३।९।११

हिंदुस्तानच्या इतिहासातील तीन मृत्युंजय रत्ने - एक महाभारतातील श्री भीष्माचार्य, द्वितीय श्रीशंभुछत्रपती आणि तृतीय स्वातंत्र्यवीर श्रीविनायक दामोदर सावरकर ! एक इच्छामरणाचे वरदान लाभल्याने ५६ दिवस शरशय्येवर राहतो, दुसरा ४० दिवस सर्व अंगाची सालटी काढली जाताना, अवयव तोडले जात असताना, डोळ्यांत तप्त सळई घुसवली जाताना व जिव्हा कापली जात असतानाही मृत्युला आवाहन देतो आणि तिसरा प्रायोपवेशनाने मृत्युस झुंजवतो! तो महाभारतातला कर्ण मृत्युंजय वगैरे नाही बरंका उगाचच कादंबरीकारांच्या नादी लागू नये.


सर्वसामान्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागते, मृत्युचा पाश यमदेवता आवळत असताना आमच्यासारखे त्यातून सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात, पण काही वीर असे असतात की अशांशी मृत्यु झुंजत असतो, कारण मृत्यु त्यांच्यापुढे जणु पराजित असतो, शेवटी त्यांनाच मृत्युची दया येते व ते त्याला जवळ ये म्हणतात आणि कवटाळतात.

अत्युक्ती वाटेल पण ज्वलज्वलनतेजस मृत्युंजय श्रीसंभाजीराजांच्या जीवनाकडे पाहिलं, विशेषतः माघ वद्य सप्तमीपासून ते आजच्या फाल्गुन वद्य अमावस्येपर्यंत जवळजवळ ४० दिवस त्यांच्याशी मृत्यूने दिलेली झुंज, त्यांनी मृत्युशी दिलेली नव्हे, ती पाहता उपरोक्त वचन अत्युक्ती ठरणार नाही. बुऱ्हाणपूरची लूट आणि मोंगली मुलखात चालवलेली लचकेतोड, तत्कालीन खडकी म्हणजे औरंगाबाद अर्थात आजच्या संभाजीनगरांवर श्रीशंभुछत्रपतींनी बसविलेली दहशत यामुळे औरंगजेब अत्यवस्थ झाला होता. शिवाय औरंगजेबाचा शहजादा अकबर संभाजीराजांच्या आश्रयाला येऊन राहिला होता. म्हणूनच खाफीखानाने म्हटल्याप्रमाणे 'दक्षिणेतल्या काफीरांचा बीमोड' करण्यासाठी स्वराज्यावर निघालेला यवनाधम म्लेंच्छ पातशहा ७ लाखांची फौज घेऊन श्रीशंभुछत्रपतींशी ९ वर्षे झुंजताना त्यांच्या तळपत्या खड्गाने तो स्वतःचाच किमाँश खाली उतरवता झाला. तिकडे गोव्यात इसवी सन १५३५ पासून ते १७१५ पर्यंत पोर्तुगीजांनी म्हणजेच ख्रिस्त्यांनी केलेले अनन्वित अत्याचार पाहून ज्यांनी हडकोळणला 'हे हिंदू राज्य आता जाहलें आहे' म्हणून शिलालेख कोरत त्या अत्याचारांस पायबंद घातला होता, मातब्बरखानाच्या पत्राप्रमाणे तळकोंकणातल्या मशिदी व मदरसे उध्वस्त करून ज्यांनी इस्लामच्या प्रचारास खीळ बसवली, अशा ज्वलज्वलनतेजस श्रीशंभुराजेंच्या चरित्राचे चिंतन करण्याचा मोह टाळता येत नाही.

कारण हा विस्तव आहे हे कितीही सत्य असलं, हातीं घेणाऱ्याला तो पोळवणारा असला तरीही ! इतिहासाचा अभ्यास आणि मांडणी ही व्यक्तिनिष्ठ पद्धतीने न करता वस्तुनिष्ठ पद्धतीने करावी हा नियम कितीही निष्ठेने पाळला तरीही !


तरीही तो ४० दिवसांचा छळ असह्य आहे...


कारण अत्यंत कविमनाचा हा रसिक योद्धा त्या सर्व असह्य पीडा सोसण्यासाठीच कसा काय जन्मला झाला होता हे कळत नाही. आपल्यासारखा कोणी असता तर पहिल्याच दिवशी शरण गेला असता आणि सुंता करून घेता. श्रीशंभुछत्रपतींची धर्मनिष्ठा मात्र वादातीत होती. बलिदानाच्या काही महिने आधी म्हणजे १६८८ मध्ये श्रीशंभुछत्रपतींनी रचलेल्या 'सातशतक' नामक काव्याकडे पाहता अंतिमतः त्यांचा डोळा हा ईश्वरी अधिष्ठानाकडे लागलेला होता हे लक्षात येते

रंग अनेक रंगे मन मेरे कहू। रंग साँवरे मे रंगि जे हैं।

अर्थ - माझं मन पूर्वी अनेक रंगांमध्ये रंगलेलं असलं तरी आता मात्र ते त्या सांवळ्या कृष्णाच्या रंगीच रंगले आहे.

संदर्भ - छत्रपति संभाजी स्मारक ग्रंथ - पृष्ठांक ३०७ 

'मन राम रंगी रंगले हो' याप्रमाणेच त्यांचे अंतःकरण आता कृष्णरंगी रंगलं होते. राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्यांनी 'आशेची निराशा व निराशेची आशा' या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे 'निर्वाणीचे धैर्य' हा जो शब्दप्रयोग केला आहे, तो इथे श्रीशंभुछत्रपतींना अत्यंत लागू होतो. 


जाता जाता...

औरंगजेबाने रहल्लुखानामार्फत श्रीशंभुछत्रपतींना विचारलेल्या दोन प्रश्नांमध्ये भले 'मुसलमान हो' म्हटल्याचा संदर्भ नसला तरी सुद्धा राजाराम महाराजांच्या आज्ञेने लिहिलेल्या चिटणीस बखरीमध्ये तो प्रश्न विचारल्याचा आणि श्रीशंभू छत्रपतींनी त्याला बाणेदारपणे नकारात्मक व अपमानास्पद प्रत्युत्तर दिल्याचा उल्लेख आहेच, पण भले तो संदर्भ समकालीन नसला तरीही त्याने श्रीशंभुछत्रपतींच्या धर्मवीरत्वावर कुठेही प्रश्नचिन्ह येत नाही. पुढे ९ मे, १७०३ला औरंगजेबाने हाच 'मुसलमान हो' प्रश्न श्रीशाहुछत्रपतींना विचारला आणि त्यांनी बाणेदारपणे नकार दिला, तो संदर्भ 'मोंगल दरबारची बातमीपत्रे खंड तीन' मध्ये जिज्ञासूंनी पहावा. आंतरजालांवर पीडीएफ सहज प्राप्य आहे.

मृत्युंजयाच्या चरणी ३३५व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी अभिवादन ! 

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com

#मृत्युंजयअमावस्या_धर्मवीर_श्रीशंभुछत्रपति_बलिदान_हिंदवीस्वराज्य_हिंदुधर्म


Tuesday 13 February 2024

महर्षि श्रीमद्दयानंदांची जन्मद्विशताब्दी

 


आज आपण जीवित असता तर आपण २०० वर्षांचे असता आणि आह्मींही आमचं जीवन आपल्या चरणी आपल्या संकल्पित वेदभाष्यासाठी निश्चित वाहिलं असतं ! १२ फेब्रुवारी १८२४ ते आज !


गेल्या २० वर्षात जितक्या महापुरुषांचं चरित्र आणि साहित्य अभ्यासलंय, त्यात जे पाच अनुकरणीय नि आदरणीय वाटतात, त्यातला हा चौथा सत्पुरुष! 


युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।


कुठलाही महापुरुष हा १००% निर्दोष नि अचूक कधीच नसतो, अपवाद केवळ भगवान श्रीरामचंद्र नि भगवान श्रीकृष्ण, हे दोन सोडले तर मी माझ्या आयुष्यात कुणालाच अंतिम नि निर्दोष मानत नाही, त्यामुळे महर्षि श्रीदयानंद नामक आपल्या काही मंतव्याशी माझेही काही प्रामाणिक मतभेद अवश्य आहेत नि राहतील, पण तरीही या सर्वांमागची आपली भूमिका निःसंदेह निःस्वार्थी नि निरलस नि विशुद्ध अंतःकरणाची होती ह्यात काहीच शंका नाही. आपल्या पाखंड खंडणाच्या हेतुविषयी माझ्या मनात तरी कधीच शंका नव्हती नि नाही. इतरांचं मला घेणंदेणं नाही, माझ्यापुरता मी ठाम आहे! इतकंच नव्हे तर आपल्या काही मंतव्यांमध्ये बदल करण्यासही मी आपणांस भाग पाडलं असतं कारण मी व्यक्ती पूजक नाही.


इतकं निश्चित आहे की श्रीदयानंदांची वेदांविषयीची भूमिका जी त्यांनी ऋग्वेदादिभाष्यभूमिका या त्यांच्या अमर ग्रंथामध्ये मांडली आहे, तीविषयी मी पूर्ण निश्चित आहे. अर्थात या ग्रंथाचे किंवा श्रीदयानंद प्रणीत मंतव्याचे खंडन करण्याचे कितीतरी प्रयत्न मागील दीडशे वर्षात अनेक विद्वानांकडून झालेले असले तरी व त्याला प्रत्यक्ष महर्षींकडून जीवितपणी व पश्चात् आर्यसमाजातल्या विद्वानांकडून तितकंच प्रत्युत्तर व पुन्हा त्याला इकडून उत्तर असा खेळ बराच झालेला असल्याने व तो सर्व अभ्यासला असल्यानेच मी श्रीदयानंदांच्या वेदांविषयीच्या भूमिकेशी तरी पूर्ण सहमत आहे, कालत्रयीही तींत बदल होईल असे आत्ता तरी वाटत नाही...!


आता प्रामाणिक मतभेदाचे जे दोन चार विषय आहेत, ते कधीतरी निवांत मांडीन ! 


कुठलाही महापुरुष नि त्याचे विचार हा त्याकाळचा उत्पाद असतो, त्यामुळे आज शेकडो वर्षानंतर आपल्या घरी निवांत खुर्चीवर बसून हातात कर्णपिशाच्च घेऊन तत्कालीन महापुरुषांच्या मतांची चिकीत्सा किंवा समीक्षा करणं हे कित्तीही सोप्पं असलं तरी ते करताना आपलीही तितकी लायकी आहे का हे पाहणं आवश्यक आहे, हा विवेक अंगी बाळगला तर बरेच वाद मिटतील.


कारण व्यक्तीपुजेने या राष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण मानव समाजाची जितकी हानी झालेली आहे, तितकी अन्य कशानेही नाही. एकीकडे लाभही झाला आहे हेही तितकंच खरं. पण वेद व्यक्तीपुजेची मान्यता देत नाहीत, हिंदुसमाज हा व्यक्तीपूजक कधीच नव्हता, तो व्यक्तीच्या आदर्शांची, सद्गुणांची, चारित्र्याची पुजा करणारा होता, त्यामुळेच तो एखादा महापुरुष चुकला तर त्याच्या चुकीला चुक म्हणणारा होता. गुरोरप्यवलिप्तस्य। किंवा उन्मार्गगामिनं - स्कंद पुराण


पण हिंदुसमाज हा या वेदमार्गापासून दूर गेल्याने मधील काळात मतमतांतराचा झालेला गलबला हा या व्यक्तीपुजेचाच परिणाम आहे ही गोष्ट कोणत्याही सूज्ञांस नाकारता येणार नाही. आज ही परिस्थिती फारशी काही वेगळी आहा अशातला भाग नाही. आणि म्हणून या मतमतांतराच्या गलबल्याने चिंतित झाल्याने या श्रीदयानंद नामक दिवाकराने सर्व मतांची समीक्षा करण्याचा जो घाट सत्यार्थ प्रकाश या त्यांच्या अमर ग्रंथामध्ये घातला, त्या ग्रंथालाही जितकी खंडणं विद्वानांकडून मागील दीड शतकांत निर्मिली गेली, त्यालाही वाद-प्रतिवाद झाले, आजही होताहेत, तेही सर्व अभ्यासल्यानंतर महर्षींच्या प्रत्येक वाक्याची तपासणी करून मूळ हेतुविषयी शंका घेण्याचं पाप मी तरी करणार नाही. 


मतभेद असणं हे बुद्धी जीवित असल्याचे लक्षण आहे...


आपल्या पूर्वजांनी या मत-मतांतराच्या गलबल्याला कधीही धिक्कारलं नाही आणि श्रीदयानंद यांचा प्रयत्न सुद्धा काही अशा तुच्छ हेतूचा होता अशातलाही भाग नाही.


अर्थात गेल्या १२-१३ वर्षांच्या तुलनात्मक अध्ययनापश्चात् निष्कर्षाला येताना जाताजाता इतकंच सांगणं आवश्यक आहे की


एक दोन-चार गोष्टी सोडल्या तर श्रीदयानंदांची मंतव्ये ही सर्व प्राचीन परंपरेला अनुसरूनंच आहेत, त्यांनी फार काही नवीन मत मांडलंय अशाचा भाग मूळीच नाहीये, वरवरपाहता आपल्याला तसं वाटायला लागतं, अर्थात संप्रदायाभिनिवेशी नि स्वमतांध लोकांना हा समन्वयाचा विवेक असणं संभव नाही नि आमची तशी त्यांच्याकडून अपेक्षाही नाही.


म्हणूनंच आमच्यापुरतं आह्मीं एकीकडे श्रीशंकराचार्य, श्रीज्ञानोबा-श्रीतुकोबांनाही धर्ममजिज्ञासेत आप्त म्हणून प्रमाण मानतो व इकडे त्यांच्या काही मतांची समीक्षा करणाऱ्या श्रीदयानंदांनाही तितकंच मानतो. 


यात काही आक्षेपार्ह आह्मांस तरी वाटत नाही!!! अन्ततोगत्वा सर्व एकंच आहेत !


हा सत्पुरुष आज जीवित असता तर आमचा हा आर्यावर्त, हे प्राचीन हिंदुराष्ट्र निःसंदेह विश्वगुरूच्या पदावर केव्हाच आरुढ झालं असतं! पण दैवदुर्विलास ! अर्थात या सर्व महापुरुषांनी आपल्या स्कंधावर दिलेलं त्यांच्या मार्गावर चालण्याचं दायित्व मात्र शेवटपर्यंत वहन करणं आवश्यक आहे!!!


शेष, वेदांकडे पुन्हा वळणं म्हणजे हिंदू धर्माला किंवा संस्कृतीला, परंपरेला, हिंदुसमाजाला एका पुस्तकापुरतं मर्यादित करणे म्हणजे संकुचित करणं असं ज्या पढतमूर्खांना आणि आजच्या तथाकथित नवहिंदुत्ववाद्यांना वाटतं, त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करण्याची माझी इच्छा मुळीच नाही, कारण त्यांच्यासाठी मला खरंच वेळ नाही! ज्या हिंदुत्ववाद्यांची इतिहासाची सुरुवात ही वेदांमध्ये आमचे आर्य इकडून आले की तिकडून गेले हे मांडण्यातूनंच होते, त्या आंधळ्यांनी मला तरी अक्कल शिकवायला येऊ नये हे नम्रतेची विनंती!


अंतिमतः महर्षींचे स्वतःचे शब्द आहेत ते पाहुयांत...


"बन्धु, हमारा कोई स्वतंत्र मत नही हैं| मैं तो वेद के अधीन हूं और हमारे भारत में पच्चीस कोटी आर्य हैं| कई कई बात में किसी किसी में कुछ कुछ भेद हैं, सो विचार करने से आप ही छूट जायेगा| मैं एक संन्यासी हूँ और मेरा कर्तव्य यही है कि जो आप लोगों का अन्न खाता हूँ इसके पर्यायमें जो सत्य समझता हूँ उसका निर्भयता से उपदेश करता हूँ| मैं कुछ कीर्तिका रागी नहीं हूँ| चाहे कोई मेरे स्तुति करें व निन्दा करें, मैं अपना कर्तव्य समझके धर्म बोध करता हूँ| कोई चाहे माने वा न माने, इसमे मेरी कोई हानि लाभ नहीं हैं|"


वेदंच सर्वोच्च प्रमाण माना म्हणणारं आपलं हे मत पुढे जाऊन आपली ही आर्यसमाजाची विचारधाराच एक स्वतंत्र पंथ किंवा मत किंवा संप्रदाय बनेल ह्याची भीती‌ प्रकट करताना सर्वांना सावध करताना महर्षि श्रीदयानंद म्हणतात...


मी सर्वज्ञ नाही - इति महर्षि दयानंद


"..और मै सर्वज्ञ भी नही हूँ| इससे यदि कोई मेरी गलती आगे पाई जाय, युक्तिपूर्वक परीक्षा करके इसी को भी सुधार लेना| यदि ऐसा न करोगे तो आगे यह भी(आर्य्य समाज विचारधारा) एक मत हो जायेगा और इसी प्रकार से 'बाबा वाक्यं प्रमाणं' करके इस भारत में नाना प्रकार के मत मतान्तर प्रचलित होके, भीतर भीतर दुराग्रह के रख के लढके नाना प्रकार की सद्विद्या का नाश करके यह भारत वर्ष दुर्दशा को प्राप्त हुआ हैं| इसमे यह भी एक मत (आर्य समाजका) का बढ़ेगा| मेरा अभिप्राय तो हैं कि इस भारत वर्ष मे नाना प्रकार के मतमतान्तर प्रचलित हैं वो भी, ये सब वेदों को मानते हैं इससे वेदशास्त्र रुपी समुद्र में यह सब नदी नाव पुन: मिला देने से धर्म ऐक्यता होगी| और धर्म ऐक्यता से सांसारिक और व्यावहारिक सुधारणा होगी और इससे कला कौशल आदि सब अभीष्ट सुधार होके मनुष्य मात्र का जीवन सफल होके अन्त में अपना धर्म बल से अर्थ, काम और मोक्ष मिल सकता है|"


कालच्या २००व्या जयंतीनिमित्त या अत्यंत वंदनीय नि महनीय ऋषिश्रेष्ठाच्या चरणी कोटी अभिवादन !!!


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_देव_दयानंद_आर्यसमाज_जन्मद्विशताब्दी_वैदिकहिंदुधर्म_संप्रदाय_उपासना

Monday 13 November 2023

महाप्रस्थानाच्या पथावर

 


यतिवर ऋषिश्रेष्ठ श्रीमद्दयानंद सरस्वति पुण्यस्मरण 

(तिकडे कार्तिक वद्य अमावस्या, आपल्याकडे अश्विन वद्य अमावस्या)

जब मैं आर्यजातिकीं सार्वत्रिक अधोगति और अवनति देखता हूँ, तो मेरी वेदना का पार नहीं रहता।

इति महर्षि श्रीदयानंद


कृण्वन्तो विश्वमार्यम् ही वेदांची नि श्रावयेच्चतुरो वर्णान् ही प्रत्यक्ष श्रीमन्महाभारताची प्रत्यक्ष जगभर वेदप्रचार करण्याची आज्ञा धिक्कारून वेदांपेक्षा मध्यकालीन स्मृतींना प्रमाण मानत विदेशयात्रा गमन निषेध करून विश्वव्यापी विश्वगुरु वैदिक धर्मांस संकुचित करणाऱ्या समुद्रबंदी सारख्या रुढींचं प्राबल्यत्व, वैदिक यज्ञामध्ये निर्दोष पशुंची हिंसा, बळीप्रथेचे थोतांड, कलिवर्ज्याचं थोतांड, शास्त्रात् रुढीर्बलीयसी ही मानसिकता, स्वमतसिद्धांतासाठी षट्दर्शनांची वेदविरुद्ध विकृत मांडणी, अवतारवादाचा अतिरेक, आठव्या किंवा सहाव्या वर्षी मुलींचा विवाह लावण्याची विकृती (धर्मसिंधु), सतीसारख्या विकृतींना वेदसंमत ठरविण्याचा अट्टाहास, केवळ ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन, एखादी विधवा स्त्री केशवपन न करता समोर आली तर तिला तुच्छ लेखत दर्शन नाकारणारे कथित संन्यासी, विधवांना पुनर्विवाहास निषेध करून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी नि त्यातून आमच्या ब्राह्मण समाजाला त्या निष्पाप माता भगिनींचे लागलेलं अश्रांत शाप, वेदांपेक्षा आपल्या कथित परंपरा प्रमाण मानणारे आचार्य नि त्यांचे अंधानुयायी, स्त्री-शुद्रांनी वेद ऐकु नये सारखी वचने स्मृतिग्रंथात घालून त्यांना वेदाधिकारापासून वंचित ठेवणे, याने अकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला शत्रुंकडून घातले गेलेलं खतपाणी, श्रीसीतेसारख्या महासाध्वीचा विवाह सहाव्या वर्षी दाखवून मध्ययुगीन स्मृतींचे विकृत समर्थन, सोवळ्याच्या नावाखाली केवल चंडालांपुरती मर्यादित असलेल्या अस्पृश्यतेला सर्वच शुद्रांसाठी जन्मजात सिद्ध करण्याचा कथित 'सनातनी' अट्टाहास नि वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित सिद्ध करण्याचा अवैदिक प्रयत्न...


वैदिक धर्माचे वाट्टोळं करणाऱ्या या धर्मविध्वंसक प्रथांना आपल्या सुतीक्ष्ण तर्काने नि अपार वेदनिष्ठेने छेद देणारा ऋषिश्रेष्ठ महात्मा आजच्याच तिथींस १८व्या विषप्रयोगाने देहदान करता झाला...


बर या सर्व गोष्टी नाकारणारे महर्षी श्रीदयानंद हे पहिले व्यक्ती होते अशातलाही भाग नाही, त्यांच्याही आधी नि नंतर अनेकांनी यातल्या काही तर काहींनी सर्वर गोष्टी धिक्कारलेल्याच आहेत, त्यामुळे श्रीदयानंदांनी हे सर्व नाकारून फार मोठ्ठा सनातन द्रोह केला असेही नव्हे, पण केवळ मूर्तीपुजा-अवतारवाद नाकारला इतकंच घोकत या दोन कारणांसाठी म्हणून ते कुणासाठी शत्रु असतील तर हे शत्रुत्व आह्मींही आजीवन मिरवु भलें आह्मीं मूर्तीपुजा अवतारवाद नाकारत नसलो तरीही...

भारतीय विद्वत्ता जेंव्हा पाश्चात्यांच्या अभ्यासाने दिपून जाऊन दिग्भ्रमित होऊन पुढे लोटांगणं घालत आर्याक्रमण मान्य करत आपल्या इतिहासाचे आपल्याच हाताने श्राद्ध घालत होती, तेंव्हा 'यस्मिन्देशे द्रुमो नास्ति तत्रैरण्डोऽपि द्रुमायते' अशी मैक्सम्युलरची निर्भ्रर्त्सना करत भारतीय इतिहासाची विशुद्ध भारतीय पंरपरेवर आधारित यथोचित ऐतिह्य मांडणीचे दिग्दर्शन नि सूत्रपात करणारा इतिहासवेत्ता आज लोपला

आपल्या आजीवन अखंड अविप्लुत नैष्ठिक ब्रह्मचर्याने नि योगसाधनेने तपःपूत देहांत त्या नीलकंठाप्रमाणे १७वेळाचा विषप्रयोग स्वीकारत आपलं मूलशंकर हे मूळ नाम सार्थ करणारा तो महायोगी आज अमावस्येच्या तिथींस स्वलोकधामी निर्गमन करता झाला...

मला चारही वेदांचे भाष्य करायला ४०० वर्षे लागतील - इति महर्षि दयानंद

जर ते जीवित असते तर आज न्यूनतम २०० वर्षांच्या आयुचे असते आणि त्यांच्या हातून वेदभाष्य तरी पूर्ण झालं असतं पण नियतीला काही गोष्टी मान्य नसतात. जर तरला इतिहासात काहीच स्थान नसतं. इतकंच काय पण त्यांनीच त्यांच्या मतप्रणालीत स्वतःहून बदलही निश्चित केला असता, कारण ते स्वतःला कधी सर्वज्ञ मानत नव्हते.

त्यांची प्रत्येक गोष्ट आंधळ्यासारखी मानावीच असा अट्टाहास त्यांच्याविषयीच्या अंधभक्तीचा सोहळा ठरण्यापेक्षा आपल्या उपासनेने, अध्ययनाने नि डोळस वृत्तीने त्यांचे जे योग्य ते स्वीकारून नि अयोग्य ते त्यागून राष्ट्रप्रथम ही वृत्ती अंगी दृढ करत वैदिक सिद्धांतानुसार जीवनाचा मार्ग धरणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल...

आज खूप काही लिहायची इच्छा होती पण वेळेअभावी इतकंच.

महर्षि दयानंद खरंच ऋषि होते का?

ज्या सत्पुरुषाचा समग्र प्रयत्न हा या भारत देशामध्ये पुन्हा एकदा वैदिक आणि आर्ष युगाच्या प्रोज्वल आणि पुनीत जीवन प्रणालीला पुनर्स्थापित करणे हा होता, ज्याचा संपूर्ण पुरुषार्थ हा प्राचीन ऋषीमुनींच्या चिंतनाला आणि कर्तुत्वाला पुनर्जीवित करणे हा होता, हेच कारण आहे की ब्रम्ह्यापासून ते महर्षी जैमिनीपर्यंतच्या ऋषि परंपरेची पुनः पुनः आठवण करून देणाऱ्या महर्षी श्रीदयानंद यांची गणना सुद्धा वशिष्ठ, विश्वामित्र आणि व्यासांसारख्या ऋषींच्या कोटीमध्ये होऊ लागली होती. दानापूर नावाच्या एका ग्रामी त्यांचं आर्ष चिंतन आणि कर्तुत्वाला, वक्तृत्वाला पाहून एकाने विचारलं की

'महाराज, आपण तर ऋषी आहात!' 

पण अत्यंत निर्लोभी, निर्मम, निरहंकारी असणाऱ्या या संन्याशाने स्वतःला त्या ऋषीपरंपरेचा अकिंचन अनुयायी आणि आर्षधारणांचा विनम्र पक्षपोषक मानत असताना अत्यंत विनम्रपणे जे उत्तर दिलं ते पाहण्यासारखे आहे, श्रीदयानंद म्हणतात

'बंध, पुराकालीन ऋषियों के अभाव में तुम मुझें कुछ भी कह लो, किन्तु यदि सांख्य एवं वैशेषिक दर्शनोंके प्रवक्ता महर्षि कपिल और कणादके युग में मैं होता, तो मेरी गणना साधारण विद्वान के रूप मे भी कथञ्चित ही हो होती।'


सरलता आणि विनम्रतेचा अनुपम साक्षात्कार करणाऱ्या या ऋषिश्रेष्ठाच्या चरणी आज पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी दंडवत प्रणाम!


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_दयानंद_पुण्यस्मरण_दीपावली_अमावस्या_सनातन_वैदिकधर्म

Friday 3 November 2023

सांख्यदर्शन निरीश्वरवादी नाही, कुठलंच वैदिक दर्शन निरीश्वरवादी नाही

 


सांख्यदर्शन निरीश्वरवादी नाही, कुठलंही वैदिक दर्शन निरीश्वरवादी नाहीयेच...

मागेही लिहिलंय की हे सर्व भ्रम आचार्यांच्या भाष्यामुळे व ते नीट समजून न घेतल्याने निर्माण झालेले भ्रम आहेत, मग ते अद्वैती असोत, द्वैती असोत किंवा अन्य असोत. यातही सर्वस्वी त्यांचा दोष नाहीये. त्यामागेही हेतु आहे. तो कसा ते पाहुयांत..

मूळात निरीश्वरवादी म्हणजे लगेचंच ईश्वर नाकारणं असेही नव्हे, सांख्यदर्शनाच्या संबंधी निरीश्वरवादाचा अर्थ केवळ जगत्सृष्ट्यत्वामध्ये ब्रह्म किंवा ईश्वराचा नियंता या रुपानेच स्वीकार आहे, सांख्यकार श्रीकपिल महामुनी हे प्रकृतींस जगताचे मूल उपादान कारण मानतात आणि ईश्वर किंवा अन्य कोणत्याही तत्वाला जगत्सृष्ट्यत्वामध्ये असिद्ध मानतात किंवा फारतर नियंता मानतात इतकंच. ते लगेचंच ईश्वराचं अस्तित्व नाकारतात असा त्याचा अर्थ नव्हे...

पण सांख्यदर्शनात खालील सुत्रांवरून त्याच्या ईश्वरनिष्ठेची साक्ष पटते. ती खालीलप्रमाणे....

ईश्वरासिद्धेः या सूत्रामध्ये ईश्वर हा केवळ उपदानाकारणत्वाच्या दृष्टीने असिद्ध सांगितला आहे याचा इथे ईश्वराचा सर्वार्थाने किंवा सरसकट निषेध नसून त्याच्यावरचे अवलंबित्व सिद्ध आहे, तो केवळ नियंता आहे इतकंच. पण या सूत्राचा अर्थ सांख्यदर्शनकार महर्षि श्रीकपिलांनी ईश्वरालाच नाकारलंय असा भ्रमाने काढला गेल्याने गोंधळ झालेला आहे.

दुसरा संदर्भ - सांख्य - ३/५६-५७
"स हि सर्ववित् सर्वकर्ता"

ह्या सूत्रांत स्पष्टपणे तो (स:) ईश्वर हा सर्वांतर्यामी थोडक्यात सर्व जाणणारा व सर्वकर्ता म्हणजेच सर्व सृष्टीचा रचयिता आहे हे स्पष्ट सांगितले आहे, यद्यपि प्रकृती उपादानकारण असली तरी.

पुढे लगेचच म्हटलंय "इदृशेश्वरसिद्धि: सिद्धा:"
म्हणजे ह्यावरूनच ईश्वराची सिद्धी दृढतेने केली गेली आहे. पांचव्या अध्यायातही सुत्र २ ते १२ ह्यातही सांख्यदर्शनकार श्रीकपिलमहामुनींची ईश्वरनिष्ठा स्पष्ट दृग्गोचर होते.

पण मग हा नेमका घोळ कुठे झाला ते पाहुयांत...

ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकेमुळे...

ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्य जर आपण व्यवस्थित अभ्यासलं तर स्पष्ट लक्षात येतं की आमच्या भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यांनी सुद्धा बौद्धमत निराकरणासाठी आपल्या लक्ष्यसाध्य हेतु ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकासारख्या ग्रंथांचा आधार घेऊन सांख्यदर्शनाच्या कथित निरीश्वरवादाचा क्षणभर आश्रय घेतला पण याचा अर्थ भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यांना मूळ सांख्यदर्शन हे निरीश्वरवादी होते असं म्हणायचं मुळीच नव्हतं हे भाष्य नीट अभ्यासलं तर कळेल. ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्याच्या २।१।१ येथील सूत्रावर आचार्यांनी 'कापिलस्य तन्त्रस्य वेदविरुद्धत्वं वेदानुसारिमनुवचनविरुद्धत्वंं च।' असे जे म्हटलंय त्यातही हेतु आहे. कारण सांख्यदर्शनकार श्रीकपिल महामुनी हे स्पष्टपणे 'पुरुषबहुत्वं व्यवस्थातः।' (६।४५) या सूत्रामध्ये स्पष्टपणे पुरुषजीवांची अनेकता सिद्ध करतात. भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी या 'ईश्वरासिद्धे:' सूत्राला नास्तिकताप्रदर्शक म्हटलेलं आहे आणि प्रकृतीच्या उपादान कारणत्वाला व जीवांच्या नानात्वाला वेदविरुद्ध यासाठी म्हटले आहे कारण त्यांच्या मायावादाच्या प्रतिपादनास त्याने विरोध येतो म्हणून. त्यांना अद्वैतमतप्रतिष्ठापनेसाठी त्या मांडणीची आवश्यकता होती. श्रीरामानुजाचार्यांनी सुद्धा त्यांच्या विशिष्टाद्वैत प्रतिपादनासाठी १।४।२३ या सूत्रांवर भाष्य करताना आचार्यांचंच अनुसरण केलेलं आहे.

मुळात ईश्वरकृष्णांची सांख्यकारिका हा आधुनिक ग्रंथ आहे, वात्सायनाच्या वेळी त्याचं अस्तित्वही नव्हतं हे स्पष्ट सिद्ध होतं कारण त्याने वार्षगण्याला उद्धृत केलं आहे, ईश्वरकृष्णांना नाही.

सांख्यदर्शनावर निरीश्वरवादाचा आरोप करणाऱ्यांनी आणखी "वार्षगण्य" नावाच्या एका विद्वानाचा संदर्भ दिला आहे की ज्यांनी मुळ कपिलांच्या सांख्यदर्शनाच्या विरोधात काही मतभेद प्रकट केला. आणि बौद्धांनी त्याचाच वापर ईश्वरखंडनासाठी म्हणजे नास्तिकतेसाठी केला. पुढे भाष्यकारांनी त्यालाच प्रमाण मानुन हे सांख्य हे निरीश्वरवादी आहेत हा सिद्धांत मांडला. दुर्दैवाने श्रीकरपात्री स्वामींसारखा प्रकांड विद्वानही 'वेदार्थपारिजातमध्ये' हेच मांडताना दिसतो अर्थात त्यामागे त्यांचा हेतुही केवळ आर्यसमाजाला विरोध करणं हाच होता. असो तो स्वतंत्र विषय...

षड्दर्शनांना निरीश्वरवादी ठरवणं हे चूक असलं तरी ती त्या आचार्यांची तत्कालीन बौद्धमत निराकरणासाठी केलेली तात्पुरती व्यवस्था होती...

आमच्या प्रज्ञाचक्षु श्रीगुलाबराव महाराजांनी यावर सुंदर विवेचन केलेलं आहे जे समन्वयाच्या दृष्टीने ते द्रष्टव्य आहे. महाराजांनी स्पष्टपणे सांख्यदर्शन हे निरीश्वरवादी नसून सेश्वर दर्शन आहे हे व्यवस्थित रीतीने पटवून दिलं आहे. आणि त्याचा वेदांताशी समन्वय करून दिला आहे. महाराज स्पष्ट म्हणतात की भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी प्रकृतीची सत्यता आणि पुरुषबहुत्व या मतांचे खंडन केले परंतु सृष्टीच्या उत्पतीचा क्रम मात्र सांख्यानुसारच घेतला. आचार्यांनी गीताभाष्यामध्ये आणि विष्णुसहस्त्रनाम भाष्यामध्ये महर्षि श्रीकपिलांचे व सांख्यशास्त्राचे वैदिकत्व स्वीकारून ते प्रमाणही मानले आहे. म्हणजे ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्यामध्ये एकीकडे हेच आचार्य सांख्यदर्शनाला अवैदिक किंवा वेदविरुद्ध ठरवतात आणि दुसरीकडे त्याचा मुक्तहस्ताने वापर करतात हा विवेक आपण लक्षात घ्यायला हवा...

षट्दर्शने म्हणजे प्रत्येक दर्शन मूळातून स्वत: संप्रदायपूर्वक म्हणजे गुरुमुखातून ब्रह्मचर्य्यपूर्वक तेही आर्षपद्धतीने अध्ययन न करता केवळ अंतिम असे वेदांत दर्शन किंवा त्यावरील आधुनिक भाष्ये अभ्यासून षट्दर्शनांविषयीची सैद्धांतिक भूमिका समजाऊन घेण्याचा प्रयत्न करणे हा आत्मघात नव्हे काय? दुर्दैवाने आर्ष भाष्यांची अनुपलब्धता हाही दोष आहे. आता उपरोक्त भाष्यकारांनी ती मूळातून अभ्यासलीच नव्हती असे समजणं चूक असलं तरी स्वत: मूळातून ती अभ्यासण्यांत हानीपेक्षा लाभंच आहे असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरेल काय? ह्यात पुन्हा द्वैत-अद्वैत-त्रैत वाद वेगळाच पण तो स्वतंत्र. अंतिम मत अनुभूतीचा विषय पण आधी अभ्यासणं तरी महत्वाचं..

पूर्वमीमांसेवर श्रीव्यासांचे, वैशेषिकांवर श्रीगौतमांचे, न्यायावर श्रीवात्सायनांचे, योगसूत्रांवर श्रीव्यासांचेच की स्वोपज्ञ(?), सांख्यावर श्रीभागुरीमुनींचे, वेदांतावर श्रीवात्सायनाचे किंवा श्रीबौधायनाचं - इति महर्षि दयानंद

ही आर्ष म्हणजे ऋषिमुनीकृत भाष्ये! ही अभ्यासणं म्हणजे समुद्राच्या गर्भात जावं व मौल्यवान मोती वर आणावीत असे साहित्य. ह्यातली केवळ न्याय व योगाची आज उपलब्ध आहेत. अन्य चार काळाच्या ओघात नष्ट झाली. आज जर ही सर्व भाष्ये उपलब्ध असती तर? तर षट्दर्शनांविषयी जो गोंधळ झाला व मतमतांतरे निर्माण झाली ती झाली नसती. हा द्वैत-अद्वैत-त्रैत वादही निर्माण झाला नसता. आपलं दुर्दैव...! अस्तु!

समूळ ग्रंथ पाहिल्यावीण, उगाचंच ठेवीं जो दूषण।
गुण सांगता अवगुण, पाहें तो येक पढतमूर्ख।
दासबोध

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#सांख्यदर्शन_निरीश्वरवाद_सेश्वरवाद_श्रीशंकराचार्य_श्रीगुलाबराव_महाराज_षट्दर्शने_प्रकृती_सांख्यकारिका


Tuesday 31 October 2023

मी महर्षि श्रीमद्दयानंदांना का मानतो???

 


कालच्या ३० ऑक्टोंबरच्या आंग्ल दिनांकाने पुण्यस्मरणानिमित्त (तिथीने दीपावली अमावस्या)

भगवान श्रीरामकृष्णादि अवतार परंपरा, भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यादि आचार्यश्रेष्ठ, श्रीज्ञानोबा-तुकोबादि संतपरंपरा इतक्या उज्ज्वल परंपरा असताना श्रीदयानंद नामक कुणीतरी नवीन आर्यसमाजी मत प्रस्थापित करणाऱ्याच्या भजनी लागायचं काय कारण असावं? तारुण्यात मनुष्याला बऱ्याच वेळा काहीतरी नवीन किंवा वेगळं अशाचं आकर्षण असतं, अशा तारुण्यसुलभ भावनेने आह्मीं महर्षि श्रीदयानंदांचे अनुयायी आहोत काय ??

ज्या श्रीदयानंदांनी वेदांकडे चला म्हणत निम्नलिखित सर्व मते ही वेदविरुद्ध आहेत असे म्हणत हिंदुंची विग्रहपूजा अर्थात मूर्तीपुजा नाकारली, अवतारवाद नाकारला, वैदिक यज्ञांमध्ये पशुहिंसा किंवा बळीप्रथा नाकारली, कपाळावर गंध, माळा आदि कर्मकांड नाकारलं, अस्पृश्यता नाकारली, जन्मजात वर्णव्यवस्था नाकारत ती गुणकर्माधिष्ठित मांडली, फलज्योतिष नाकारलं, संतपरंपरा काहीअंशी नाकारल्या, श्रीमद्भागवतादि पुराणे नाकारली, गंगादि नद्यांचे तीर्थत्व नाकारलं, मध्ययुगीन स्मृत्या नाकारल्या, वेदविरुद्ध प्रक्षेपांच्या नावाने त्यांच्या सैद्धांतिक बैठकीनुसार ते नाकारलं, धर्मसिंधु-निर्णयसिंधु-तर्कसंग्रह-सिद्धांतकौमुदि आदि ग्रंथ अनार्ष म्हणून जितके वेदविरुद्ध तितके नाकारले, एवढा सर्व प्रचलित 'सनातन धर्म' नाकारत एक वेगळीच चूल मांडायचा घाट घातला ते श्रीदयानंद आह्मांला इतके प्रिय कसे???

सायण-महीधरादि आधीचे सर्व वेदभाष्यकार काहीअंशी चुकीचे व मीच तेवढा खरा वेदार्थ जाणणारा ही भावना बाळगणारे किंवा तसे मांडणारे श्रीदयानंद आह्मांस इतके प्रिय कसे???

जे काही प्रचलित आहे ते सर्व वेदविरुद्ध आहे व मी सांगतोय तेच खरं वेदसंमत ही श्रीदयानंदांची साहित्यातून दिसणारी वृत्ती कितपत स्वीकारार्ह्य आहे???

हे सर्व काम त्यांनी ब्रिटीशांच्या प्रभावाने केलं आहे काय?खरंच श्रीदयानंद काहीतरी वेगळीच चुल मांडणारे आहेत काय? आधीच्या बव्हतांश परंपरा व प्रचलित सनातन धर्म नाकारण्यांत श्रीदयानंदांचा खरंच काही दुष्ट हेतु होता का???

कालच्या श्रीदयानंदांच्या आंग्लदिनांकाने पुण्यतिथीनिमित्त या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न हा पूर्वीही खरंतर आमच्या दीडदोन तासाच्या फेबुलाईव्हमध्ये आह्मीं मागेच केला आहे, तरीही पुनः संक्षेपांत विवरण करणं आवश्यक असल्याने हा लेखनप्रपंच...!

मूळात श्रीदयानंद स्वीकारणे म्हणजे आधीच्या सर्व परंपरा नाकारणे असा अर्थ होतंच नाही, त्यामुळे हा भ्रम आधी दूर करणे आवश्यक आहे.

श्रीदयानंदांचा सत्यार्थ प्रकाश हा अजरामर ग्रंथ वाचताना आरंभी आरंभी हे जाणवतं की हा माणुस खरंच आपल्या सर्वच परंपरा नाकारतोय आणि तेही वेदांच्या नावाखाली??? म्हणजे आधीचे सर्व वेडे व हाच एकटा शहाणा? हे कितपत स्वीकारार्ह्य आहे याच प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न...

श्रीदयानंदांचं म्हणणं इतकंच होते की धर्माधर्माचा निर्णय करताना वेदांच्या चार संहिता याच सर्वोच्च प्रमाण आहेत ही प्रत्यक्ष मनुमहाराजांची आज्ञा आहे, त्यामुळे त्याच्या जे अनुकूल तेच ग्राह्य व जे प्रतिकुल ते अग्राह्य ही त्यांची भूमिका होती. ही भूमिका वरवरपाहता अनाठायी वाटत असली तरी श्रीदयानंदांनी तिच्या पुष्ट्यर्थ प्रत्येक ठिकाणी तर्कशुद्ध प्रमाण सादर करूनच आपल्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. आज उपलब्ध असलेला प्रचलित सनातन धर्म हा मूळ वैदिक सिद्धांतापासून बराच दूर गेला आहे हे त्यांचे निरीक्षण, जे आह्मांसही मान्य आहेच, ते त्यांनी अनेक प्रमाण प्रस्तुत करून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांची मते मांडताना व आधीची नाकारताना त्यांनी स्वतः एक कटाक्ष ठेवलेला आहे तो असा की

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।

कुठल्याही महापुरुषाचे वचन हे युक्तीने ग्रहण करावं, केवळ त्याच्या मोठेपणाकडे पाहून नव्हे.

तापाच्छेदाच्च निकषात् सुवर्णमिव पण्डितैः।
परीक्ष्य मद्वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।
भास्कराचार्य

सोनं ज्याप्रमाणे तावून सुलाखून तपासून स्वीकारलं जातं तद्वतंच माझी वचनेही चिकीत्सेने तपासूनंच स्वीकारावीत, केवळ माझ्या मोठेपणाकडे, पांडित्याकडे पाहून नव्हे..





हा विवेक हिंदुंना पूर्वी जो होता तो मधील काळात लुप्त झाला, जो महर्षि श्रीदयानंदांनी पुनः प्राप्त करून दिला. महर्षि स्वतः म्हणतात की

"बन्धु, हमारा कोई स्वतंत्र मत नही हैं| मैं तो वेद के अधीन हूं और हमारे भारत में पच्चीस कोटी आर्य हैं| कई कई बात में किसी किसी में कुछ कुछ भेद हैं, सो विचार करने से आप ही छूट जायेगा| मैं एक संन्यासी हूँ और मेरा कर्तव्य यही है कि जो आप लोगों का अन्न खाता हूँ इसके पर्यायमें जो सत्य समझता हूँ उसका निर्भयता से उपदेश करता हूँ| मैं कुछ कीर्तिका रागी नहीं हूँ| चाहे कोई मेरे स्तुति करें व निन्दा करें, मैं अपना कर्तव्य समझके धर्म बोध करता हूँ| कोई चाहे माने वा न माने, इसमे मेरी कोई हानि लाभ नहीं हैं|"

आज हिंदुस्थानात आपण अनेक मतमतांतरे, संप्रदाय, पंथ पाहतो. अशा परिस्थितीत वेदांनाच सर्वोच्च प्रमाण माना म्हणणारं आपलं हे मत पुढे जाऊन आपली ही आर्यसमाजाची विचारधाराच एक स्वतंत्र पंथ किंवा मत किंवा संप्रदाय बनेल ह्याची भीती‌ प्रकट करताना सर्वांना सावध करताना युगद्रष्टे महर्षि श्रीमद्दयानंद स्पष्टपणे म्हणतात...

"..और मै सर्वज्ञ भी नही हूँ| इससे यदि कोई मेरी गलती आगे पाई जाय, युक्तिपूर्वक परीक्षा करके इसी को भी सुधार लेना| यदि ऐसा न करोगे तो आगे यह भी(आर्य्य समाज विचारधारा) एक मत हो जायेगा और इसी प्रकार से 'बाबा वाक्यं प्रमाणं' करके इस भारत में नाना प्रकार के मत मतान्तर प्रचलित होके, भीतर भीतर दुराग्रह के रख के लढके नाना प्रकार की सद्विद्या का नाश करके यह भारत वर्ष दुर्दशा को प्राप्त हुआ हैं| इसमे यह भी एक मत (आर्य समाजका) का बढ़ेगा| मेरा अभिप्राय तो हैं कि इस भारत वर्ष मे नाना प्रकार के मतमतान्तर प्रचलित हैं वो भी, ये सब वेदों को मानते हैं इससे वेदशास्त्र रुपी समुद्र में यह सब नदी नाव पुन: मिला देने से धर्म ऐक्यता होगी| और धर्म ऐक्यता से सांसारिक और व्यावहारिक सुधारणा होगी और इससे कला कौशल आदि सब अभीष्ट सुधार होके मनुष्य मात्र का जीवन सफल होके अन्त में अपना धर्म बल से अर्थ, काम और मोक्ष मिल सकता है|"

महर्षी स्वत: म्हणताहेत की त्यांच्या प्रत्येक मताची चिकित्सा करावी व मगच ते स्वीकारावे. केवळ ते म्हणताहेत म्हणून नव्हे. जर त्यांचे मत कुठे चुकीचं आहे असे दिसत असेल, प्रमाणांनी, अनुभवाने चुकीचं सिद्ध होत असेल, तर ते सुधरावे...

याउलट आमचंच मत सर्वोच्च आहे, मी सर्वज्ञ आहे, याचा अमुक अवतार आहे, त्याचा तमुक अवतार आहे, इतर सर्व मते तुच्छ आहेत, केवळ आमच्याच मार्गाने या तरंच तुमचं कल्याण होईल ही भावना बाळगणारी व पेरणारी संप्रदायाभिनिवेशी, पंथाभिमानी, मिथ्या दुराग्रह बाळगणारी मतमतांतरे कुठे नि महर्षि श्रीमद्दयानंद कोठे???

इतकी स्वच्छ, तर्कशुद्ध, विवेकी नि समन्वयात्मक भुमिका ठेवणारे श्रीमद्दयानंद आह्मांस नकोसे वाटतात, ह्यापेक्षा आमची शोकांतिका कोणती आहे?? याचा अर्थ असा नव्हे की आपण आधीपासुन पाळत असलेल्या परंपरा सोडून द्याव्यांत. मूळीच नाही. पण विचार करून जे योग्य ते ठेवावं व वाईट ते‌ सोडावं इतकंच...

जाता जाता हे सांगणं आवश्यक आहे की श्रीदयानंदांच्या सत्यार्थ प्रकाश व ऋग्वेदादिभाष्यभूमिका या दोन ग्रंथांची म्हणजेच त्यांच्या मन्तव्याची जितकी खंडणं आजपावेतो उपलब्ध आहेत, तितकी खचितंच अन्य कुठल्या ग्रंथाची कुणी करायचा प्रयत्न केला असावा आणि त्या खंडनांना पुन्हा आर्यविद्वानांकडून दिली गेलेली मंडनात्मक उत्तरेही आहेत, तीही सर्व पठनीय आहेत. सांगायचं तात्पर्य इतकंच की आंधळेपणाने कुणाचंही मत स्वीकारु नयेच हाच आदर्श वस्तुपाठ आहे...



३० ऑक्टोबर, १८८३ या दिवशी विषप्रयोगाने देह त्यागाची वेळ आली त्याच्या काही दिवस आधीच आपली भूमिका या वीतरागी संन्याशाने मांडताना लिहिलं होते की

''मी मेल्यानंतर माझ्या अस्थी कुणालाही न सांगता नदीमध्ये किंवा अज्ञात स्थळी पुराव्यात, अन्यथा काही लोक माझ्याविषयीच्या भोळ्या भक्तीतून त्याची समाधी बनवतील व वेद व ईश्वर सोडून मलाच पूजत बसतील.''

वेदांनुसार संन्याशाचा देहही जाळायलाच हवा, त्याला पुरणं किंवा नदीत विसर्जित करणे हे वेदविरुद्ध आहे, म्हणून श्रीदयानंदांचा देह जाळण्यात आला होता. यावर सविस्तर येईन कधीतरी.

एकीकडे मी गेल्यानंतर माझी समाधी इथेच अमुकतमुक ठिकाणी मांडा असे म्हणणारे आहेत तर दुसरीकडे इतकी निर्गर्वी, निःस्पृह, निरलस, निःस्वार्थ, निर्मम, निर्लेप, शुद्ध भूमिका मांडणाऱ्या विद्वानाला आपण एकदा तरी अभ्यासणं योग्य नव्हे काय??? याला काही अपवाद मीही मानतो, तो वेगळा विषय. 

सर्वांना एक नम्रतेची विनंती की आयुष्यांत एकदा तरी महर्षींचे निम्नलिखित दोन ग्रंथ तरी अवश्य अभ्यासावेत...

१. सत्यार्थ प्रकाश - सत्यनिष्ठ वैदिक मत कोणते हे मांडणारी अमर ग्रंथसंपदा
२. ऋग्वेदादिभाष्यभूमिका -‌ वेदांकडे कसं पहावं, वेदांचे सत्यनिष्ठ स्वरुप नेमकं काय याविषयीची विस्तृत भूमिका

हे दोन्ही ग्रंथ‌ मराठीतून उपलब्ध आहेत...

पीडीएफ धागे

१.https://archive.org/download/in.ernet.dli.2015.484671/2015.484671.Satyarthprakash.pdf

२. https://archive.org/details/foqe_vaidik-dharm-swarup-of-dayanand-saraswati-translation-by-shridas-vidyarthi-1933-

वाचकांनी स्वत: निर्णय घ्यावा...

वेदांकडे वळावे हीच नम्रतेची विनंती...

भवदीय...

#महर्षिदयानंदसरस्वती_पुण्यतिथी_आर्य्यसमाज_वैदिकसिद्धांत_हिंदुधर्म_मतमतांतरे_संप्रदाय_पंथ